हेमलकसाचे वास्तवदर्शन घडवणारे फोटोप्रदर्शन ठाण्यात
17 Sep 2009, 0134 hrs IST
प्रिंट मेल Discuss शेअर सेव प्रतिक्रिया फॉन्ट:
म. टा. प्रतिनिधी। ठाणे
दिवंगत बाबा आमटेंनी सुरू केलेला आणि डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या प्रयत्नांनी बहरलेला हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पांचे काम पाहिले की शब्द थिटे पडतात. या प्रकल्पाचे फोटोप्रदर्शन ठाण्यातल्या राम मारूती रोड येथील शुभंकरोती हॉलमध्ये १८ ते २१ सप्टेंबर या कालावधीत पाहायला मिळेल. केवळ कोरड्या शब्दांनी कौतुक करण्यापेक्षा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष हातभार लावून कृतीने कौतुक करण्याची जबाबदारी आता ठाणेकरांच्या खांद्यावर यानिमित्ताने आली आहे. बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीद्वारा २३ डिसेंबर १९७३ रोजी बाबांनीच प्रकल्पाची सुरुवात केली. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा गावी माडिया गोंड जातीच्या आदिवासींना जनावरांपेक्षाही वाईट आयुष्य जगताना बाबांनी पाहिले व आदिवासींच्या सेवेसाठी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. बाबांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा यांनी साडेतीन दशके अथक परिश्रम करून प्रकल्पाला आजचे रूप दिले. पर्लकोटा, पामुलगौतमी आणि इंदावतीच्या तीरावर माणूस जगवण्याचं काम सुरू आहे.
आदिवासींच्या मुलांसाठी बारावीपर्यंत आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत ६५० मुले शिकतात. मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे आहेत. येथे स्थानिक कला व उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून त्यांना बांबू क्राफ्ट, सुतारकाम, मेटल क्राफ्ट, शिवणकाम व संगीताचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. आदिवासींसाठी सुसज्ज दवाखाना आहे. १९७४ ला झोपडीत सुरू झालेल्या दवाखान्याचे स्वरूप आता पूर्ण बदलले आहे. दवाखान्यासाठी स्वतंत्र इमारत आहे. ५० पेशंट राहतील इतके वॉर्ड आहेत. सोनोग्राफी, एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, डिलिव्हरी रूम, ऑपरेशन थिएटर अशा सर्व सोयी येथे उपलब्ध आहेत व आदिवासींना या सोयी विनामूल्य आहेत. या वैद्यकीय सुविधेचा लाभ ४५ हजारांहून अधिक आदिवासी घेत असून, वर्षाकाठी येथे ३०० शस्त्रक्रिया होतात. वन्यप्राण्यांसाठी येथे अनाथालय आहे. सात-आठ जातींचे कुत्रे, बिबटे, रानडुकरं, कोल्हे, अस्वल, हरणं, माकड, मगरी, नाग, पटेरी मण्यार, घोणस, अजगर, साळिंदर, घुबडं, शॅमेलिऑन असे विविध प्राणी येथे आहेत. हे अनाथालयाला प्राणीप्रेमींच्या देणगीतून ते चालवले जाते. त्यामुळेच या कार्याला सातत्याने प्रचंड निधीची गरज आहे.
मुंबईपासून १२०० किमी अंतरावर अतिदुर्गम प्रदेशात असलेल्या या प्रकल्पापर्यंत शहरी माणसाला पोहोचणे शक्य नाही, म्हणून हा लोकबिरादरी प्रकल्पच आता आपल्या दारापाशी आला आहे. या प्रदर्शनाला आपण कसा प्रतिसाद देतो, यावर आपल्या संवेदनांची, सुसंस्कृतपणाची आणि दानशूरतेची कसोटी लागणार आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं तिथे जाण्याची गरज आहे. विशेषत: पालक संस्कारक्षम वयात असलेल्या आपल्या मुलांना तिकडे घेऊन गेले आणि त्यांच्यासमोर आजवर आलेल्या आयुष्यापेक्षा सर्वस्वी भिन्न, जळजळीत वास्तव त्यांना दाखवले तर, पुढे करीअर मागीर् लागल्यानंतरही त्यांच्यातील सामाजिक भान जागे राहील आणि मग अशा प्रकारच्या चांगल्या प्रकल्पांना पैशांची ददात भासणार नाही. या प्रकल्पाला मदतीचा हात देण्यासाठी ९८६९४३११८५ किंवा ९८२१०१३६४१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment