Showing posts with label Exhibition of Lok Biradari Prakalpa in THANE. Show all posts
Showing posts with label Exhibition of Lok Biradari Prakalpa in THANE. Show all posts

Thursday, October 1, 2009

News in Maharashtra Times dt. 30th Sept, 2009

हेमलकसाला ठाणेकरांकडून १५ लाख
30 Sep 2009, 0115 hrs IST


हेमलकसाच्या आदिवासींना ठाणेकरांची १५ लाखांची मदत


>> म. टा. प्रतिनिधी

हेमलकसातले अतिमागास आदिवासी जनावरांपेक्षाही वाईट आयुष्य जगताना पाहिलं आणि त्यांच्या उन्नतीसाठी लोकबिरादरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ बाबा आमटे यांनी रोवली. त्याचा वारसा डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे चालवत आहेत. माणूस जगवण्याचं काम करणाऱ्या या प्रकल्पाला मदतीचा हात देण्यासाठी तयार केलेले फोटो प्रदर्शन नुकतेच ठाण्यात भरले होते. केवळ कोरड्या शब्दांनी कौतुक करण्यापेक्षा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष हातभार लावून कृतीने कौतुक करण्याची जबाबदारी ठाणेकरांवर होती. ती त्यांनी मोठ्या हिमतीने पेलली. सुमारे १५ लाख रुपयांचा मदतनिधी आणि आदिवासींनी चार हजार ग्रिटींग कार्डची विक्री या प्रदर्शनातून झाली आहे. या पैशातून प्रकल्पातल्या सामाजिक उपक्रमांना मोठा हातभार लागणार आहे. .

मुंबईपासून १२०० किमी अंतरावर अतिदुर्गम प्रदेशात असलेल्या या प्रकल्पापर्यंत शहरी माणसाला पोहोचणं शक्य होत नाही, म्हणून हा लोकबिरादरी प्रकल्पच ठाणेकरांच्या दारापाशी आला होता. या प्रदर्शनाला ठाणेकर कसा प्रतिसाद देतात यावर संवेदनांची, सुसंस्कृतपणाची आणि दानशूरतेची कसोटी लागणार होती. त्या कसोटीवर ठाणेकर खरे उतरले. हजारो ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली. तिथे ठेवलेल्या मदतीच्या पेट्यांमध्ये प्रत्येकानेच आपल्याला झेपेल एवढी आथिर्क मदत केली. चेक आणि रोख अशा स्वरुपात आलेली ही मदत १५ लाख रुपयांच्या घरात असल्याचे सागण्यात आले. पालक संस्कारक्षम वयात असलेल्या आपल्या मुलांना तिकडे घेऊन येत होते. आपण जगत असलेल्या आयुष्यापेक्षा सर्वस्वी भिन्न, जळजळीत वास्तव आपल्या मुलांना दाखवत होते. फोटोंमधले हे वास्तव बघून अनेक तरुणांचे मन हेलावले. त्यांनी या प्रकल्पात काही दिवस स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. या प्रकल्पातल्या आदिवासींनी आणि कुष्ठरोज्यांनी स्पेशल ग्रिटींग तयार केली आहेत. एका ग्रिटींगची किंमत अवघी १३ रुपये होती. दररोजी एक हजार ग्रिटींग विकली जात होती. ठाणेकरांच्या या प्रतिसादामुळे आयोजकही भारावले होते.

या प्रकल्पातील आदिवासी आश्रमशाळेत ६५० मुलं शिकतात. मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे आहेत. इथे बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. आदिवासींना इथे विविध कौशल्याची कामं शिकवली जातात. स्थानिक कला व उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून त्यांना बांबू क्राफ्ट, सुतारकाम, मेटल क्राफ्ट, शिवणकाम व संगीताचे प्रशिक्षण दिलं जातं. आदिवासींसाठी सुसज्ज दवाखाना आहे. ५० रुज्ण राहू शकतील, असे वॉर्ड, सोनोग्राफी, एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, डिलिव्हरी रूम, ऑपरेशन थिएटर अशा सर्व सोयी इथे उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे आदिवासींना त्या विनामूल्य आहेत. या वैद्यकिय सुविधेचा लाभ ४५ हजारांहून अधिक आदिवासी घेत असून वर्षाकाठी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ३०० शस्त्रक्रिया केल्या जातात. या साऱ्या योजना ठाणेकरांनी दिलेल्या निधीतून अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहेत. मदतीचा ओघ असाच सुरू राहिला तर अशा प्रकारच्या चांगल्या प्रकल्पांना पैशांची कधीच ददात भासणार नाही.

Friday, September 18, 2009

News in LOKMAT about opening of Exhibition of Lok Biradari Prakalp

New in Maharashtra Times about opening of Exhibition of Lok Biradari Prakalp

भरत जाधवचे लोकबिरादरीसाठी स्पेशल शो
19 Sep 2009, 0201 hrs IST



म. टा. प्रतिनिधी


'हेमलकसाचा लोकबिरादरीसारखा प्रकल्प कथा नसून वास्तव आहे. या वास्तवाची जाणीव झाल्यावर, केवळ कोरड्या शब्दांनी कौतुक करण्यापेक्षा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष हातभार लावून कृतीने कौतुक करायला हवे' अशा शब्दात मराठीचा आघाडीचा स्टार भरत जाधव आणि सुनिल बवेर् यांनी लोकबिरादरी प्रकल्पाला हातभार लावण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यासाठी नाटक आणि कार्यक्रमांचे स्पेशल प्रयोग आयोजित करण्याचेही त्यांनी शुक्रवारी ठाण्यात जाहीर केले.

भरत जाधव आणि सुनिल बवेर् यांच्या उपस्थितीत लोकबिरादरी प्रकल्पाच्या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ठाण्यातील शुभंकरोती हॉल येथे झाले. उद्घाटनानंतर बोलताना अत्यंत अनौपचारिक आणि आत्मियतेने भरत आणि सुनिल बवेर् यांनी प्रकल्पासाठी मदतीचा आश्वासक हात पुढे केला. हेमलकासाचा लोकबिरादरी प्रकल्पापुढे शद्ब थिटे पडतात. इतके मोठे काम करण्याचा विचारही कुणी करू शकत नाही. तसेच, हे काम पाहिल्यानंतर आम्ही काहीच करत नसल्याची खात्री पटते आणि एवढ्या मोठ्या कामात आपले काहीही योगदान नसल्याची खंत सुनिलने यावेळी व्यक्त केली. तसेच, भरतनेही यावेळी आनंदवनात नाटक करण्याचा योग आला नाही याबाबत खंत व्यक्त केली. लोकबिरादरी प्रकल्प पाहिल्यानंतर मानात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रकल्पासाठी मदतीचा हात पुढे करणार असल्याचे या दोन अभिनेत्यांनी सांगितले.

बाबा आमटे यांचे नातू आणि या प्रदर्शनाचे आयोजक अनिकेत आमटे यांनी सामाजिक जाणिवांचे भान जपत कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल या दोन अभिनेत्यांचे आभार मानले. ठाण्यातल्या न्यू इंज्लिश स्कूलच्या मागच्याबाजूस असलेल्या शुभंकरोती हॉल येथे २१ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत सुरू राहणार आहे. येथे हेमलकसाच्या आदिवासींनी हातांनी बनवलेल्या वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हेमलकसा प्रकल्पाला लागणाऱ्या निधीच्या उभारणीसाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला उपस्थिती लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Thursday, September 17, 2009

Lokastta - Interview of Shri. Aniket Prakash Amte

हेमलकसाची लोकबिरादरी नव्या कार्यकर्त्यांच्या शोधात 18th Sept. 2009
ठाणे/प्रतिनिधी - आनंदवन असो वा हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प, हे काही एकटय़ाचे काम नाही. बाबा आमटे यांच्या प्रेरणेने आणि त्यांचे काम पाहून प्रभावित झालेल्या अनेक कार्यकर्त्यांमुळे समाजसेवेचा हा जगन्नाथाचा रथ अव्याहतपणे सुरू आहे. दिवसेंदिवस काम वाढत असून कार्यकर्त्यांची संख्या मात्र तेवढीच आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि विविध प्रकल्पांसाठी लागणारा निधी संकलित करण्यासाठी दोन वर्षापासून प्रदर्शनाच्या रूपाने हा प्रकल्प महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मांडला जातोय. त्यातून गावोगावी नवे मित्र, कार्यकर्ते आणि मोठय़ा प्रमाणात मदत मिळतेय, असे आमटे परिवाराच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश आमटे यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत आमटे यांनी येथील प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
नौपाडातील राम मारुती रोडवरील शुभंकरोती सभागृहात १८ ते २१ सप्टेंबर दरम्यान हेमलकसाचा हा लोकबिरादरी प्रकल्प ठाण्यात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तब्बल १५० छायाचित्रे आणि स्थानिक आदिवासींनी बनविलेल्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. डॉ. अनिकेत आमटे, त्यांच्या पत्नी समीक्षा आमटे आणि आनंदवन व हेमलकसा प्रकल्पांमधील दुवा म्हणून काम करणारे नागापल्ली येथील जगनभाऊ उर्फ जगन्नाथ मचकले यानिमित्त सध्या ठाण्यात आहेत.
महाराष्ट्रातील अनेकांना हेमलकसा अथवा आनंदवनला भेट देण्याची इच्छा असते, पण वेळेअभावी सर्वानाच जायला जमते असे नाही. त्यामुळे प्रदर्शनाचा उपक्रम सुरू केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळू लागल्याचे डॉ. अनिकेत यांनी सांगितले. अनेक मुलांनी आपले वाढदिवस करणे सोडून देऊन ते पैसे या प्रकल्पाला द्यायला सुरुवात केली आहे. आनंदवन समूहातील विविध प्रकल्पांना निधी लागतोच, पण त्याचबरोबर किमान एक-दोन वर्षे काम करू शकणाऱ्या कार्यकर्त्यांचीही गरज आहे. प्रदर्शन भरू लागल्यापासून हेमलकसाला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. हेमलकसा येथे आरोग्य केंद्राच्या बरोबरीनेच आश्रमशाळेचाही पसारा वाढत आहे. अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या आदिवासी समाजाच्या उद्धाराचे काम डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे आणि त्यांचे कुटुंबीय गेली अनेक वर्षे करीत आहे. अजूनही त्या भागात शाळेत मुलींचे प्रमाण कमी आहे. मुलींसाठी हेमलकसा येथे नवे वसतिगृह उभारण्याची योजना आहे.
प्रत्येकाला हेमलकसा अथवा आनंदवनात येऊन काम करता येईलच असे नाही, किंबहुना ते अपेक्षितही नाही. मात्र आपल्या सुरक्षित चाकोरीबद्ध आयुष्याच्या पलीकडेही एक जग आहे. त्या जगातील दुख अपार आहे, याची जाणीव हा प्रकल्प पाहून होते आणि आपापल्या सभोवताली दिसणारे दुख कमी करण्याची संवेदना जागृत होते. ठाणे परिसरातील रहिवाशांनी विशेषत तरुणांनी या प्रदर्शनाला भेट देऊन यथाशक्ती या प्रकल्पास सहाय्य करावे, असे आवाहन आनंदवन स्नेही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

News in Lokmat - Interview of Shri. Aniket Prakash Amte

News in Maharashtra Times about exhibition in THANE

हेमलकसाचे वास्तवदर्शन घडवणारे फोटोप्रदर्शन ठाण्यात
17 Sep 2009, 0134 hrs IST
प्रिंट मेल Discuss शेअर सेव प्रतिक्रिया फॉन्ट:


म. टा. प्रतिनिधी। ठाणे


दिवंगत बाबा आमटेंनी सुरू केलेला आणि डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या प्रयत्नांनी बहरलेला हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पांचे काम पाहिले की शब्द थिटे पडतात. या प्रकल्पाचे फोटोप्रदर्शन ठाण्यातल्या राम मारूती रोड येथील शुभंकरोती हॉलमध्ये १८ ते २१ सप्टेंबर या कालावधीत पाहायला मिळेल. केवळ कोरड्या शब्दांनी कौतुक करण्यापेक्षा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष हातभार लावून कृतीने कौतुक करण्याची जबाबदारी आता ठाणेकरांच्या खांद्यावर यानिमित्ताने आली आहे. बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीद्वारा २३ डिसेंबर १९७३ रोजी बाबांनीच प्रकल्पाची सुरुवात केली. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा गावी माडिया गोंड जातीच्या आदिवासींना जनावरांपेक्षाही वाईट आयुष्य जगताना बाबांनी पाहिले व आदिवासींच्या सेवेसाठी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. बाबांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा यांनी साडेतीन दशके अथक परिश्रम करून प्रकल्पाला आजचे रूप दिले. पर्लकोटा, पामुलगौतमी आणि इंदावतीच्या तीरावर माणूस जगवण्याचं काम सुरू आहे.

आदिवासींच्या मुलांसाठी बारावीपर्यंत आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत ६५० मुले शिकतात. मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे आहेत. येथे स्थानिक कला व उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून त्यांना बांबू क्राफ्ट, सुतारकाम, मेटल क्राफ्ट, शिवणकाम व संगीताचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. आदिवासींसाठी सुसज्ज दवाखाना आहे. १९७४ ला झोपडीत सुरू झालेल्या दवाखान्याचे स्वरूप आता पूर्ण बदलले आहे. दवाखान्यासाठी स्वतंत्र इमारत आहे. ५० पेशंट राहतील इतके वॉर्ड आहेत. सोनोग्राफी, एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, डिलिव्हरी रूम, ऑपरेशन थिएटर अशा सर्व सोयी येथे उपलब्ध आहेत व आदिवासींना या सोयी विनामूल्य आहेत. या वैद्यकीय सुविधेचा लाभ ४५ हजारांहून अधिक आदिवासी घेत असून, वर्षाकाठी येथे ३०० शस्त्रक्रिया होतात. वन्यप्राण्यांसाठी येथे अनाथालय आहे. सात-आठ जातींचे कुत्रे, बिबटे, रानडुकरं, कोल्हे, अस्वल, हरणं, माकड, मगरी, नाग, पटेरी मण्यार, घोणस, अजगर, साळिंदर, घुबडं, शॅमेलिऑन असे विविध प्राणी येथे आहेत. हे अनाथालयाला प्राणीप्रेमींच्या देणगीतून ते चालवले जाते. त्यामुळेच या कार्याला सातत्याने प्रचंड निधीची गरज आहे.

मुंबईपासून १२०० किमी अंतरावर अतिदुर्गम प्रदेशात असलेल्या या प्रकल्पापर्यंत शहरी माणसाला पोहोचणे शक्य नाही, म्हणून हा लोकबिरादरी प्रकल्पच आता आपल्या दारापाशी आला आहे. या प्रदर्शनाला आपण कसा प्रतिसाद देतो, यावर आपल्या संवेदनांची, सुसंस्कृतपणाची आणि दानशूरतेची कसोटी लागणार आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं तिथे जाण्याची गरज आहे. विशेषत: पालक संस्कारक्षम वयात असलेल्या आपल्या मुलांना तिकडे घेऊन गेले आणि त्यांच्यासमोर आजवर आलेल्या आयुष्यापेक्षा सर्वस्वी भिन्न, जळजळीत वास्तव त्यांना दाखवले तर, पुढे करीअर मागीर् लागल्यानंतरही त्यांच्यातील सामाजिक भान जागे राहील आणि मग अशा प्रकारच्या चांगल्या प्रकल्पांना पैशांची ददात भासणार नाही. या प्रकल्पाला मदतीचा हात देण्यासाठी ९८६९४३११८५ किंवा ९८२१०१३६४१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.