Thursday, September 17, 2009

Lokastta - Interview of Shri. Aniket Prakash Amte

हेमलकसाची लोकबिरादरी नव्या कार्यकर्त्यांच्या शोधात 18th Sept. 2009
ठाणे/प्रतिनिधी - आनंदवन असो वा हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प, हे काही एकटय़ाचे काम नाही. बाबा आमटे यांच्या प्रेरणेने आणि त्यांचे काम पाहून प्रभावित झालेल्या अनेक कार्यकर्त्यांमुळे समाजसेवेचा हा जगन्नाथाचा रथ अव्याहतपणे सुरू आहे. दिवसेंदिवस काम वाढत असून कार्यकर्त्यांची संख्या मात्र तेवढीच आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि विविध प्रकल्पांसाठी लागणारा निधी संकलित करण्यासाठी दोन वर्षापासून प्रदर्शनाच्या रूपाने हा प्रकल्प महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मांडला जातोय. त्यातून गावोगावी नवे मित्र, कार्यकर्ते आणि मोठय़ा प्रमाणात मदत मिळतेय, असे आमटे परिवाराच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश आमटे यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत आमटे यांनी येथील प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
नौपाडातील राम मारुती रोडवरील शुभंकरोती सभागृहात १८ ते २१ सप्टेंबर दरम्यान हेमलकसाचा हा लोकबिरादरी प्रकल्प ठाण्यात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तब्बल १५० छायाचित्रे आणि स्थानिक आदिवासींनी बनविलेल्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. डॉ. अनिकेत आमटे, त्यांच्या पत्नी समीक्षा आमटे आणि आनंदवन व हेमलकसा प्रकल्पांमधील दुवा म्हणून काम करणारे नागापल्ली येथील जगनभाऊ उर्फ जगन्नाथ मचकले यानिमित्त सध्या ठाण्यात आहेत.
महाराष्ट्रातील अनेकांना हेमलकसा अथवा आनंदवनला भेट देण्याची इच्छा असते, पण वेळेअभावी सर्वानाच जायला जमते असे नाही. त्यामुळे प्रदर्शनाचा उपक्रम सुरू केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळू लागल्याचे डॉ. अनिकेत यांनी सांगितले. अनेक मुलांनी आपले वाढदिवस करणे सोडून देऊन ते पैसे या प्रकल्पाला द्यायला सुरुवात केली आहे. आनंदवन समूहातील विविध प्रकल्पांना निधी लागतोच, पण त्याचबरोबर किमान एक-दोन वर्षे काम करू शकणाऱ्या कार्यकर्त्यांचीही गरज आहे. प्रदर्शन भरू लागल्यापासून हेमलकसाला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. हेमलकसा येथे आरोग्य केंद्राच्या बरोबरीनेच आश्रमशाळेचाही पसारा वाढत आहे. अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या आदिवासी समाजाच्या उद्धाराचे काम डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे आणि त्यांचे कुटुंबीय गेली अनेक वर्षे करीत आहे. अजूनही त्या भागात शाळेत मुलींचे प्रमाण कमी आहे. मुलींसाठी हेमलकसा येथे नवे वसतिगृह उभारण्याची योजना आहे.
प्रत्येकाला हेमलकसा अथवा आनंदवनात येऊन काम करता येईलच असे नाही, किंबहुना ते अपेक्षितही नाही. मात्र आपल्या सुरक्षित चाकोरीबद्ध आयुष्याच्या पलीकडेही एक जग आहे. त्या जगातील दुख अपार आहे, याची जाणीव हा प्रकल्प पाहून होते आणि आपापल्या सभोवताली दिसणारे दुख कमी करण्याची संवेदना जागृत होते. ठाणे परिसरातील रहिवाशांनी विशेषत तरुणांनी या प्रदर्शनाला भेट देऊन यथाशक्ती या प्रकल्पास सहाय्य करावे, असे आवाहन आनंदवन स्नेही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment