Wednesday, September 23, 2009

Article by Shri. Prashant More - LOKSATTA - THANE

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

(सविस्तर वृत्त)
‘आनंदवन' भुवनी!
प्रशांत मोरे


सगे-सोयरे आणि समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांनी स्वकष्टाने उभारलेली आदर्श वसाहत, एवढय़ापुरतीच आता आनंदवनची ओळख सीमित राहिलेली नाही. ‘श्रम ही है श्रीराम हमारा’ हा बाबा आमटे यांनी दिलेला मंत्र आचरणात आणून प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देत आनंदवनातले हे रहिवासी सन्मानाने जगायला शिकलेच, शिवाय आजूबाजूच्या हताश आणि निराश समाजजीवनातही त्यांनी चैतन्याचे बीज पेरले. येत्या ९ फेब्रुवारीला बाबा आमटे यांचा प्रथम स्मृतिदिन. या निमित्ताने आनंदवन, झरी-झामणी, हेमलकसा आणि सोमनाथ या प्रकल्पांना भेट देऊन लिहिलेला वृत्तान्त..


महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात वरोरा या छोटय़ा शहरात कुष्ठरोगामुळे समाजाने वाळीत टाकलेल्या उपेक्षितांनी बाबा आमटेंच्या प्रेरणेने शासनाने दिलेल्या ओबडधोबड जागेत ‘आनंदवन’ नावाचे नंदनवन उभारले. कुणाच्याही दयेवर अवलंबून न राहता स्वकष्टाने शून्यातून स्वर्ग साकारण्याची किमया बाबांच्या या जिगरबाज अनुयायींनी दाखवली. लौकिक आयुष्यातून बाबा नावाचा सूर्य आता अस्तंगत झाला असला तरी आनंदवनाच्या मातीत त्यांनी पेरलेल्या जिद्द आणि आत्मविश्वासाच्या प्रकाशाने येथील जवळजवळ प्रत्येकजण एका विशिष्ट प्रेरित


ध्येयाने जीवनात वाटचाल करताना दिसतो. गमाविण्यासारखं काहीही शिल्लक नसणाऱ्यांनी येथे फुलविलेले सृजनाचे मळे थक्क करून सोडतातच, शिवाय जगण्याचा एक नवा धडा शिकवून जातात.
४५० एकर जागेत वसलेल्या या प्रतिसृष्टीत सध्या अडीच हजार कुष्ठरोगी राहतात. शेतकी महाविद्यालय, मूकबधिर विद्यालय, अंध विद्यालय, कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय अशा साऱ्या शैक्षणिक सुविधा आनंदवनात आहेत. शिवाय हातमाग, यंत्रमाग, सायकल निर्मिती, प्लास्टिक पुनर्वापर इ. २४ प्रकल्प येथे अव्याहतपणे सुरू आहेत. स्वत:च्या व्यंगावर कष्टाने मात करीत हसत हसत स्वाभिमानाने जीवन जगणारी, अतिशय सामान्य आयुष्यातही असामान्य कर्तृत्व करून दाखविणारी माणसं येथे भेटतात.
शकुंतला बारिंगे ही हाताने लुळी असणारी तरुणी पायाने ग्रीटिंग कार्डासारखे कलाकुसरीचे काम करताना येथे दिसते. प्रल्हाद ठक हे येथील मूकबधिर विद्यालयात चित्रकला शिक्षक आहेत. पोलिओमुळे आलेल्या अपंगत्वावर मात करून या जिद्दी कलावंताने अतिशय जिद्दीने आपली कला जोपासली आहे. अलिकडेच त्यांनी एकटय़ाने एक लाख चौरस फूट रांगोळी सलग तीन दिवस काम करून रेखाटली आहे. त्यासाठी त्यांना तीन ट्रॅक्टर भरून रांगोळी लागली. नागपूर कला महाविद्यालयातून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेल्या या तरुण कलावंताने स्वत:च्या रक्ताने तब्बल ७० क्रांतिकारकांची चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांचे मुंबईतील कलादालनात प्रदर्शन भरविण्याची त्यांची इच्छा आहे.
जिज्ञासा कुबडे-चवळदार ही अशीच एक जिद्दी तरुणी. वयाच्या १९ व्या वर्षी सेकंड इअर बी.ए.ला असताना नेत्रदोष उद्भवून तिला अंधत्व आले. अर्थात पुढचे शिक्षण थांबले. मग मतिमंदांच्या शाळेत ती योग आणि संगीत शिकवू लागली. २००० मध्ये जिज्ञासा आनंदवनात आली आणि इथेच तिच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. डॉ. भारती आमटेंच्या प्रेरणेने ती अॅस्ट्रॉलॉजी, रेकी, नॅचरोपॅथी, अॅक्युप्रेशर शिकली. बंगळूर येथे जाऊन मायक्रोसॉफ्टने खास अंधांसाठी विकसित केलेल्या ‘जॉस’ या संगणक प्रणालीचा वापर करून तिने एमएलसीआयटी केले. सध्या व्हॉइस फिडबॅक असणाऱ्या या सॉफ्टवेअरचा वापर करून आनंदवनमध्ये ती अंधांना संगणक प्रशिक्षण देते.


सध्या तिच्या केंद्रात ९५ विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत.
आनंदवनापासून ७० किलोमीटर अंतरावर डॉ. विकास आमटे, अरुण कदम आणि सहकाऱ्यांनी झरी-झामणी येथे स्थानिक शेतकऱ्यांना मदत करणारा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सुरू केला. ३५ हेक्टर जागेत स्थानिक तरुणांना विश्वासात घेऊन आनंदवनासारखीच प्रतिसृष्टी उभारण्याचे या मंडळींचे प्रयत्न आहेत.


गावातील अधिकाधिक जमीन ओलिताखाली यावी म्हणून मूळ गव्हाण गावातील नाल्यावर टायर आणि काँक्रिटच्या सहाय्याने बंधारा बांधला. आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे तंत्र शिकविले. यवतमाळ जिल्ह्यातील या दुष्काळी भागात पूर्वी एकही जण भाजीपाला पिकवीत नव्हता. आता प्रकल्पाचा कित्ता गिरवीत तब्बल ९३ जण भाजीपाला लावू लागले आहेत.


आंध्र प्रदेशच्या सीमेवरील या भागात कोलाम आदिवासींचे वास्तव्य राहतात. नागेपल्ली हे चंद्रपूर जिल्ह्यातले ठिकाण म्हणजे आनंदवनहून हेमलकसाला जाणारा बेसकॅम्प आहे. जगन भाऊ (जगन्नाथ मसकले) आणि मुक्ताताई हे सदा हसतमुख जोडपे या कॅम्पची व्यवस्था पाहतात. पूर्वी आनंदवनहून हेमलकसा येथे जाताना नागेपल्लीपर्यंतच पक्का रस्ता होता. त्यामुळे आनंदवनातले निरोप हेमलकसा येथे पोहोचविण्याचे काम जगनभाऊंनी मोठय़ा कष्टाने केले. आजही ते आपली कामगिरी चोख बजावीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ तालुक्यातील सोमनाथ प्रकल्प म्हणजे आनंदवनचे धान्य कोठार. येथील १३०० एकर जागेत विविध प्रकारची धान्ये आणि भाजीपाला पिकविला जातो. हरिभाऊ बागडे, बदलापूरहून आनंदवनमध्ये स्वच्छेने राहण्यास आलेले प्रमोद बक्षी आणि इतर या प्रकल्पाची देखभाल करतात. प्रकाश आणि मंदा आमटे हे दाम्पत्य तसेच सहकाऱ्यांचा हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प या घनदाट अरण्यात वर्षांनुवर्षे पशुवत जीवन जगणाऱ्या ‘माडिया गौड’ या आदिवासी जमातीसाठी जणू वरदान ठरला आहे. आदिवासींच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या पुढील पिढय़ांना शिक्षण देण्याची कामगिरीही या प्रकल्पाने समर्थपणे पार पाडलेली दिसते. आपण काहीतरी वेगळं, समाजहिताचं महान कार्य करतोय, असा अजिबात आव न आणता ही सारी मंडळी आपापल्या कामात मग्न दिसतात. हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्पात माणसांबरोबरच बिबळे, कोल्हे, हरिण, अस्वल, साप आदी वन्यप्राणीही गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. साधनाताई आमटे, सीताकांत प्रभू, साठेकाका, आनंदवन कुटुंबास स्वत:चे माहेर संबोधणारी अमेरिकेतील चंदा आठले अशी अनेक व्यक्तिमत्त्वे इथे भेटतात. मग सारे काही मनोहर असूनही आपल्याला उदास का वाटते, असा प्रश्न येथे फिरताना आपल्याला पडतो. शहरी धावपळीतून आलेले अस्वस्थपण कुठल्या कुठे पळून जाते. मंदीची धास्ती वाटेनाशी होते. कारण ‘आनंदवन’ समूह हे आता केवळ कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन किंवा आदिवासींना आरोग्य आणि शिक्षण सुविधा पुरविणारे केंद्र राहिलेले नाही.
प्रत्येकाच्या मनाला उभारी येईल, एवढे स्पिरिट या प्रतिसृष्टीत काठोकाठ भरलेले आहे. मरगळलेलं, काहीसं सुस्तावलेलं आपलं आयुष्य चार्ज करण्याची शक्ती या आनंदयात्रेतून मिळते.
संपर्क- आनंदवन- ९५७१७६/२८२०३४, २८२४२५
हेमलकसा- ९५७१३४-२२०००१, ९४२३१२१८०३.
Email- moreprashant2000@gmail.com

No comments:

Post a Comment