हेमलकसाला ठाणेकरांकडून १५ लाख
30 Sep 2009, 0115 hrs IST
हेमलकसाच्या आदिवासींना ठाणेकरांची १५ लाखांची मदत
>> म. टा. प्रतिनिधी
हेमलकसातले अतिमागास आदिवासी जनावरांपेक्षाही वाईट आयुष्य जगताना पाहिलं आणि त्यांच्या उन्नतीसाठी लोकबिरादरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ बाबा आमटे यांनी रोवली. त्याचा वारसा डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे चालवत आहेत. माणूस जगवण्याचं काम करणाऱ्या या प्रकल्पाला मदतीचा हात देण्यासाठी तयार केलेले फोटो प्रदर्शन नुकतेच ठाण्यात भरले होते. केवळ कोरड्या शब्दांनी कौतुक करण्यापेक्षा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष हातभार लावून कृतीने कौतुक करण्याची जबाबदारी ठाणेकरांवर होती. ती त्यांनी मोठ्या हिमतीने पेलली. सुमारे १५ लाख रुपयांचा मदतनिधी आणि आदिवासींनी चार हजार ग्रिटींग कार्डची विक्री या प्रदर्शनातून झाली आहे. या पैशातून प्रकल्पातल्या सामाजिक उपक्रमांना मोठा हातभार लागणार आहे. .
मुंबईपासून १२०० किमी अंतरावर अतिदुर्गम प्रदेशात असलेल्या या प्रकल्पापर्यंत शहरी माणसाला पोहोचणं शक्य होत नाही, म्हणून हा लोकबिरादरी प्रकल्पच ठाणेकरांच्या दारापाशी आला होता. या प्रदर्शनाला ठाणेकर कसा प्रतिसाद देतात यावर संवेदनांची, सुसंस्कृतपणाची आणि दानशूरतेची कसोटी लागणार होती. त्या कसोटीवर ठाणेकर खरे उतरले. हजारो ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली. तिथे ठेवलेल्या मदतीच्या पेट्यांमध्ये प्रत्येकानेच आपल्याला झेपेल एवढी आथिर्क मदत केली. चेक आणि रोख अशा स्वरुपात आलेली ही मदत १५ लाख रुपयांच्या घरात असल्याचे सागण्यात आले. पालक संस्कारक्षम वयात असलेल्या आपल्या मुलांना तिकडे घेऊन येत होते. आपण जगत असलेल्या आयुष्यापेक्षा सर्वस्वी भिन्न, जळजळीत वास्तव आपल्या मुलांना दाखवत होते. फोटोंमधले हे वास्तव बघून अनेक तरुणांचे मन हेलावले. त्यांनी या प्रकल्पात काही दिवस स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. या प्रकल्पातल्या आदिवासींनी आणि कुष्ठरोज्यांनी स्पेशल ग्रिटींग तयार केली आहेत. एका ग्रिटींगची किंमत अवघी १३ रुपये होती. दररोजी एक हजार ग्रिटींग विकली जात होती. ठाणेकरांच्या या प्रतिसादामुळे आयोजकही भारावले होते.
या प्रकल्पातील आदिवासी आश्रमशाळेत ६५० मुलं शिकतात. मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे आहेत. इथे बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. आदिवासींना इथे विविध कौशल्याची कामं शिकवली जातात. स्थानिक कला व उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून त्यांना बांबू क्राफ्ट, सुतारकाम, मेटल क्राफ्ट, शिवणकाम व संगीताचे प्रशिक्षण दिलं जातं. आदिवासींसाठी सुसज्ज दवाखाना आहे. ५० रुज्ण राहू शकतील, असे वॉर्ड, सोनोग्राफी, एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, डिलिव्हरी रूम, ऑपरेशन थिएटर अशा सर्व सोयी इथे उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे आदिवासींना त्या विनामूल्य आहेत. या वैद्यकिय सुविधेचा लाभ ४५ हजारांहून अधिक आदिवासी घेत असून वर्षाकाठी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ३०० शस्त्रक्रिया केल्या जातात. या साऱ्या योजना ठाणेकरांनी दिलेल्या निधीतून अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहेत. मदतीचा ओघ असाच सुरू राहिला तर अशा प्रकारच्या चांगल्या प्रकल्पांना पैशांची कधीच ददात भासणार नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment