Wednesday, September 23, 2009

Article by Shri. Prashant More - LOKSATTA - THANE

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

(सविस्तर वृत्त)
‘आनंदवन' भुवनी!
प्रशांत मोरे


सगे-सोयरे आणि समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांनी स्वकष्टाने उभारलेली आदर्श वसाहत, एवढय़ापुरतीच आता आनंदवनची ओळख सीमित राहिलेली नाही. ‘श्रम ही है श्रीराम हमारा’ हा बाबा आमटे यांनी दिलेला मंत्र आचरणात आणून प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देत आनंदवनातले हे रहिवासी सन्मानाने जगायला शिकलेच, शिवाय आजूबाजूच्या हताश आणि निराश समाजजीवनातही त्यांनी चैतन्याचे बीज पेरले. येत्या ९ फेब्रुवारीला बाबा आमटे यांचा प्रथम स्मृतिदिन. या निमित्ताने आनंदवन, झरी-झामणी, हेमलकसा आणि सोमनाथ या प्रकल्पांना भेट देऊन लिहिलेला वृत्तान्त..


महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात वरोरा या छोटय़ा शहरात कुष्ठरोगामुळे समाजाने वाळीत टाकलेल्या उपेक्षितांनी बाबा आमटेंच्या प्रेरणेने शासनाने दिलेल्या ओबडधोबड जागेत ‘आनंदवन’ नावाचे नंदनवन उभारले. कुणाच्याही दयेवर अवलंबून न राहता स्वकष्टाने शून्यातून स्वर्ग साकारण्याची किमया बाबांच्या या जिगरबाज अनुयायींनी दाखवली. लौकिक आयुष्यातून बाबा नावाचा सूर्य आता अस्तंगत झाला असला तरी आनंदवनाच्या मातीत त्यांनी पेरलेल्या जिद्द आणि आत्मविश्वासाच्या प्रकाशाने येथील जवळजवळ प्रत्येकजण एका विशिष्ट प्रेरित


ध्येयाने जीवनात वाटचाल करताना दिसतो. गमाविण्यासारखं काहीही शिल्लक नसणाऱ्यांनी येथे फुलविलेले सृजनाचे मळे थक्क करून सोडतातच, शिवाय जगण्याचा एक नवा धडा शिकवून जातात.
४५० एकर जागेत वसलेल्या या प्रतिसृष्टीत सध्या अडीच हजार कुष्ठरोगी राहतात. शेतकी महाविद्यालय, मूकबधिर विद्यालय, अंध विद्यालय, कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय अशा साऱ्या शैक्षणिक सुविधा आनंदवनात आहेत. शिवाय हातमाग, यंत्रमाग, सायकल निर्मिती, प्लास्टिक पुनर्वापर इ. २४ प्रकल्प येथे अव्याहतपणे सुरू आहेत. स्वत:च्या व्यंगावर कष्टाने मात करीत हसत हसत स्वाभिमानाने जीवन जगणारी, अतिशय सामान्य आयुष्यातही असामान्य कर्तृत्व करून दाखविणारी माणसं येथे भेटतात.
शकुंतला बारिंगे ही हाताने लुळी असणारी तरुणी पायाने ग्रीटिंग कार्डासारखे कलाकुसरीचे काम करताना येथे दिसते. प्रल्हाद ठक हे येथील मूकबधिर विद्यालयात चित्रकला शिक्षक आहेत. पोलिओमुळे आलेल्या अपंगत्वावर मात करून या जिद्दी कलावंताने अतिशय जिद्दीने आपली कला जोपासली आहे. अलिकडेच त्यांनी एकटय़ाने एक लाख चौरस फूट रांगोळी सलग तीन दिवस काम करून रेखाटली आहे. त्यासाठी त्यांना तीन ट्रॅक्टर भरून रांगोळी लागली. नागपूर कला महाविद्यालयातून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेल्या या तरुण कलावंताने स्वत:च्या रक्ताने तब्बल ७० क्रांतिकारकांची चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांचे मुंबईतील कलादालनात प्रदर्शन भरविण्याची त्यांची इच्छा आहे.
जिज्ञासा कुबडे-चवळदार ही अशीच एक जिद्दी तरुणी. वयाच्या १९ व्या वर्षी सेकंड इअर बी.ए.ला असताना नेत्रदोष उद्भवून तिला अंधत्व आले. अर्थात पुढचे शिक्षण थांबले. मग मतिमंदांच्या शाळेत ती योग आणि संगीत शिकवू लागली. २००० मध्ये जिज्ञासा आनंदवनात आली आणि इथेच तिच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. डॉ. भारती आमटेंच्या प्रेरणेने ती अॅस्ट्रॉलॉजी, रेकी, नॅचरोपॅथी, अॅक्युप्रेशर शिकली. बंगळूर येथे जाऊन मायक्रोसॉफ्टने खास अंधांसाठी विकसित केलेल्या ‘जॉस’ या संगणक प्रणालीचा वापर करून तिने एमएलसीआयटी केले. सध्या व्हॉइस फिडबॅक असणाऱ्या या सॉफ्टवेअरचा वापर करून आनंदवनमध्ये ती अंधांना संगणक प्रशिक्षण देते.


सध्या तिच्या केंद्रात ९५ विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत.
आनंदवनापासून ७० किलोमीटर अंतरावर डॉ. विकास आमटे, अरुण कदम आणि सहकाऱ्यांनी झरी-झामणी येथे स्थानिक शेतकऱ्यांना मदत करणारा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सुरू केला. ३५ हेक्टर जागेत स्थानिक तरुणांना विश्वासात घेऊन आनंदवनासारखीच प्रतिसृष्टी उभारण्याचे या मंडळींचे प्रयत्न आहेत.


गावातील अधिकाधिक जमीन ओलिताखाली यावी म्हणून मूळ गव्हाण गावातील नाल्यावर टायर आणि काँक्रिटच्या सहाय्याने बंधारा बांधला. आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे तंत्र शिकविले. यवतमाळ जिल्ह्यातील या दुष्काळी भागात पूर्वी एकही जण भाजीपाला पिकवीत नव्हता. आता प्रकल्पाचा कित्ता गिरवीत तब्बल ९३ जण भाजीपाला लावू लागले आहेत.


आंध्र प्रदेशच्या सीमेवरील या भागात कोलाम आदिवासींचे वास्तव्य राहतात. नागेपल्ली हे चंद्रपूर जिल्ह्यातले ठिकाण म्हणजे आनंदवनहून हेमलकसाला जाणारा बेसकॅम्प आहे. जगन भाऊ (जगन्नाथ मसकले) आणि मुक्ताताई हे सदा हसतमुख जोडपे या कॅम्पची व्यवस्था पाहतात. पूर्वी आनंदवनहून हेमलकसा येथे जाताना नागेपल्लीपर्यंतच पक्का रस्ता होता. त्यामुळे आनंदवनातले निरोप हेमलकसा येथे पोहोचविण्याचे काम जगनभाऊंनी मोठय़ा कष्टाने केले. आजही ते आपली कामगिरी चोख बजावीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ तालुक्यातील सोमनाथ प्रकल्प म्हणजे आनंदवनचे धान्य कोठार. येथील १३०० एकर जागेत विविध प्रकारची धान्ये आणि भाजीपाला पिकविला जातो. हरिभाऊ बागडे, बदलापूरहून आनंदवनमध्ये स्वच्छेने राहण्यास आलेले प्रमोद बक्षी आणि इतर या प्रकल्पाची देखभाल करतात. प्रकाश आणि मंदा आमटे हे दाम्पत्य तसेच सहकाऱ्यांचा हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प या घनदाट अरण्यात वर्षांनुवर्षे पशुवत जीवन जगणाऱ्या ‘माडिया गौड’ या आदिवासी जमातीसाठी जणू वरदान ठरला आहे. आदिवासींच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या पुढील पिढय़ांना शिक्षण देण्याची कामगिरीही या प्रकल्पाने समर्थपणे पार पाडलेली दिसते. आपण काहीतरी वेगळं, समाजहिताचं महान कार्य करतोय, असा अजिबात आव न आणता ही सारी मंडळी आपापल्या कामात मग्न दिसतात. हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्पात माणसांबरोबरच बिबळे, कोल्हे, हरिण, अस्वल, साप आदी वन्यप्राणीही गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. साधनाताई आमटे, सीताकांत प्रभू, साठेकाका, आनंदवन कुटुंबास स्वत:चे माहेर संबोधणारी अमेरिकेतील चंदा आठले अशी अनेक व्यक्तिमत्त्वे इथे भेटतात. मग सारे काही मनोहर असूनही आपल्याला उदास का वाटते, असा प्रश्न येथे फिरताना आपल्याला पडतो. शहरी धावपळीतून आलेले अस्वस्थपण कुठल्या कुठे पळून जाते. मंदीची धास्ती वाटेनाशी होते. कारण ‘आनंदवन’ समूह हे आता केवळ कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन किंवा आदिवासींना आरोग्य आणि शिक्षण सुविधा पुरविणारे केंद्र राहिलेले नाही.
प्रत्येकाच्या मनाला उभारी येईल, एवढे स्पिरिट या प्रतिसृष्टीत काठोकाठ भरलेले आहे. मरगळलेलं, काहीसं सुस्तावलेलं आपलं आयुष्य चार्ज करण्याची शक्ती या आनंदयात्रेतून मिळते.
संपर्क- आनंदवन- ९५७१७६/२८२०३४, २८२४२५
हेमलकसा- ९५७१३४-२२०००१, ९४२३१२१८०३.
Email- moreprashant2000@gmail.com

Friday, September 18, 2009

News in LOKMAT about opening of Exhibition of Lok Biradari Prakalp

New in Maharashtra Times about opening of Exhibition of Lok Biradari Prakalp

भरत जाधवचे लोकबिरादरीसाठी स्पेशल शो
19 Sep 2009, 0201 hrs IST



म. टा. प्रतिनिधी


'हेमलकसाचा लोकबिरादरीसारखा प्रकल्प कथा नसून वास्तव आहे. या वास्तवाची जाणीव झाल्यावर, केवळ कोरड्या शब्दांनी कौतुक करण्यापेक्षा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष हातभार लावून कृतीने कौतुक करायला हवे' अशा शब्दात मराठीचा आघाडीचा स्टार भरत जाधव आणि सुनिल बवेर् यांनी लोकबिरादरी प्रकल्पाला हातभार लावण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यासाठी नाटक आणि कार्यक्रमांचे स्पेशल प्रयोग आयोजित करण्याचेही त्यांनी शुक्रवारी ठाण्यात जाहीर केले.

भरत जाधव आणि सुनिल बवेर् यांच्या उपस्थितीत लोकबिरादरी प्रकल्पाच्या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ठाण्यातील शुभंकरोती हॉल येथे झाले. उद्घाटनानंतर बोलताना अत्यंत अनौपचारिक आणि आत्मियतेने भरत आणि सुनिल बवेर् यांनी प्रकल्पासाठी मदतीचा आश्वासक हात पुढे केला. हेमलकासाचा लोकबिरादरी प्रकल्पापुढे शद्ब थिटे पडतात. इतके मोठे काम करण्याचा विचारही कुणी करू शकत नाही. तसेच, हे काम पाहिल्यानंतर आम्ही काहीच करत नसल्याची खात्री पटते आणि एवढ्या मोठ्या कामात आपले काहीही योगदान नसल्याची खंत सुनिलने यावेळी व्यक्त केली. तसेच, भरतनेही यावेळी आनंदवनात नाटक करण्याचा योग आला नाही याबाबत खंत व्यक्त केली. लोकबिरादरी प्रकल्प पाहिल्यानंतर मानात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रकल्पासाठी मदतीचा हात पुढे करणार असल्याचे या दोन अभिनेत्यांनी सांगितले.

बाबा आमटे यांचे नातू आणि या प्रदर्शनाचे आयोजक अनिकेत आमटे यांनी सामाजिक जाणिवांचे भान जपत कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल या दोन अभिनेत्यांचे आभार मानले. ठाण्यातल्या न्यू इंज्लिश स्कूलच्या मागच्याबाजूस असलेल्या शुभंकरोती हॉल येथे २१ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत सुरू राहणार आहे. येथे हेमलकसाच्या आदिवासींनी हातांनी बनवलेल्या वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हेमलकसा प्रकल्पाला लागणाऱ्या निधीच्या उभारणीसाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला उपस्थिती लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Thursday, September 17, 2009

Lokastta - Interview of Shri. Aniket Prakash Amte

हेमलकसाची लोकबिरादरी नव्या कार्यकर्त्यांच्या शोधात 18th Sept. 2009
ठाणे/प्रतिनिधी - आनंदवन असो वा हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प, हे काही एकटय़ाचे काम नाही. बाबा आमटे यांच्या प्रेरणेने आणि त्यांचे काम पाहून प्रभावित झालेल्या अनेक कार्यकर्त्यांमुळे समाजसेवेचा हा जगन्नाथाचा रथ अव्याहतपणे सुरू आहे. दिवसेंदिवस काम वाढत असून कार्यकर्त्यांची संख्या मात्र तेवढीच आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि विविध प्रकल्पांसाठी लागणारा निधी संकलित करण्यासाठी दोन वर्षापासून प्रदर्शनाच्या रूपाने हा प्रकल्प महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मांडला जातोय. त्यातून गावोगावी नवे मित्र, कार्यकर्ते आणि मोठय़ा प्रमाणात मदत मिळतेय, असे आमटे परिवाराच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश आमटे यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत आमटे यांनी येथील प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
नौपाडातील राम मारुती रोडवरील शुभंकरोती सभागृहात १८ ते २१ सप्टेंबर दरम्यान हेमलकसाचा हा लोकबिरादरी प्रकल्प ठाण्यात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तब्बल १५० छायाचित्रे आणि स्थानिक आदिवासींनी बनविलेल्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. डॉ. अनिकेत आमटे, त्यांच्या पत्नी समीक्षा आमटे आणि आनंदवन व हेमलकसा प्रकल्पांमधील दुवा म्हणून काम करणारे नागापल्ली येथील जगनभाऊ उर्फ जगन्नाथ मचकले यानिमित्त सध्या ठाण्यात आहेत.
महाराष्ट्रातील अनेकांना हेमलकसा अथवा आनंदवनला भेट देण्याची इच्छा असते, पण वेळेअभावी सर्वानाच जायला जमते असे नाही. त्यामुळे प्रदर्शनाचा उपक्रम सुरू केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळू लागल्याचे डॉ. अनिकेत यांनी सांगितले. अनेक मुलांनी आपले वाढदिवस करणे सोडून देऊन ते पैसे या प्रकल्पाला द्यायला सुरुवात केली आहे. आनंदवन समूहातील विविध प्रकल्पांना निधी लागतोच, पण त्याचबरोबर किमान एक-दोन वर्षे काम करू शकणाऱ्या कार्यकर्त्यांचीही गरज आहे. प्रदर्शन भरू लागल्यापासून हेमलकसाला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. हेमलकसा येथे आरोग्य केंद्राच्या बरोबरीनेच आश्रमशाळेचाही पसारा वाढत आहे. अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या आदिवासी समाजाच्या उद्धाराचे काम डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे आणि त्यांचे कुटुंबीय गेली अनेक वर्षे करीत आहे. अजूनही त्या भागात शाळेत मुलींचे प्रमाण कमी आहे. मुलींसाठी हेमलकसा येथे नवे वसतिगृह उभारण्याची योजना आहे.
प्रत्येकाला हेमलकसा अथवा आनंदवनात येऊन काम करता येईलच असे नाही, किंबहुना ते अपेक्षितही नाही. मात्र आपल्या सुरक्षित चाकोरीबद्ध आयुष्याच्या पलीकडेही एक जग आहे. त्या जगातील दुख अपार आहे, याची जाणीव हा प्रकल्प पाहून होते आणि आपापल्या सभोवताली दिसणारे दुख कमी करण्याची संवेदना जागृत होते. ठाणे परिसरातील रहिवाशांनी विशेषत तरुणांनी या प्रदर्शनाला भेट देऊन यथाशक्ती या प्रकल्पास सहाय्य करावे, असे आवाहन आनंदवन स्नेही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

News in Lokmat - Interview of Shri. Aniket Prakash Amte

News in LOKSATTA dt. 17th Sept. 2009

हेमलकसाची लोकबिरादरी ठाण्यात
ठाणे/प्रतिनिधी - गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील आमटे कुटुंबीय संचालित लोकबिरादरी प्रकल्प प्रदर्शनाच्या रूपाने ठाणेकरांच्या भेटीस येत आहे. शुभंकरोती हॉल, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, नौपाडा येथे १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान सकाळी १० ते रात्री ९ दरम्यान हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असेल.
१९७४ मध्ये बाबा आमटे यांनी हा प्रकल्प सुरू केला. त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आणि स्नुषा मंदाकिनी आमटे सुरुवातीपासून इथे कार्यरत आहेत. या प्रकल्पात दरवर्षी सरासरी ४५ हजार रुग्णांवर उपचार केले जातात, तसेच ३०० शस्त्रक्रियाही होतात. १९७६ मध्ये आदिवासींच्या मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून येथे आश्रमशाळा सुरू करण्यात आली. सुरुवातीला त्यात २५ विद्यार्थी होते. सध्या या शाळेत ६५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तिथे बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे.
वन्यप्रश्नण्यांचे अनाथालय हेही हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाचे वैशिष्टय़ आहे. या बहुउद्देशीय प्रकल्पास भेट देण्याची अनेकांची इच्छा असते, पण वेळेअभावी गडचिरोलीला जाणे सगळ्यांनाच जमत नाही. या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबई-ठाणेकरांना छोटय़ा स्वरूपात का होईना, हा प्रकल्प समजावून घेता येईल. तसेच या समाजोपयोगी प्रकल्पास यथाशक्ती मदतही करता येईल. संपर्क- २५३४११८५/ ९८२१०१३६४१.

News in Maharashtra Times about exhibition in THANE

हेमलकसाचे वास्तवदर्शन घडवणारे फोटोप्रदर्शन ठाण्यात
17 Sep 2009, 0134 hrs IST
प्रिंट मेल Discuss शेअर सेव प्रतिक्रिया फॉन्ट:


म. टा. प्रतिनिधी। ठाणे


दिवंगत बाबा आमटेंनी सुरू केलेला आणि डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या प्रयत्नांनी बहरलेला हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पांचे काम पाहिले की शब्द थिटे पडतात. या प्रकल्पाचे फोटोप्रदर्शन ठाण्यातल्या राम मारूती रोड येथील शुभंकरोती हॉलमध्ये १८ ते २१ सप्टेंबर या कालावधीत पाहायला मिळेल. केवळ कोरड्या शब्दांनी कौतुक करण्यापेक्षा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष हातभार लावून कृतीने कौतुक करण्याची जबाबदारी आता ठाणेकरांच्या खांद्यावर यानिमित्ताने आली आहे. बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीद्वारा २३ डिसेंबर १९७३ रोजी बाबांनीच प्रकल्पाची सुरुवात केली. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा गावी माडिया गोंड जातीच्या आदिवासींना जनावरांपेक्षाही वाईट आयुष्य जगताना बाबांनी पाहिले व आदिवासींच्या सेवेसाठी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. बाबांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा यांनी साडेतीन दशके अथक परिश्रम करून प्रकल्पाला आजचे रूप दिले. पर्लकोटा, पामुलगौतमी आणि इंदावतीच्या तीरावर माणूस जगवण्याचं काम सुरू आहे.

आदिवासींच्या मुलांसाठी बारावीपर्यंत आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत ६५० मुले शिकतात. मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे आहेत. येथे स्थानिक कला व उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून त्यांना बांबू क्राफ्ट, सुतारकाम, मेटल क्राफ्ट, शिवणकाम व संगीताचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. आदिवासींसाठी सुसज्ज दवाखाना आहे. १९७४ ला झोपडीत सुरू झालेल्या दवाखान्याचे स्वरूप आता पूर्ण बदलले आहे. दवाखान्यासाठी स्वतंत्र इमारत आहे. ५० पेशंट राहतील इतके वॉर्ड आहेत. सोनोग्राफी, एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, डिलिव्हरी रूम, ऑपरेशन थिएटर अशा सर्व सोयी येथे उपलब्ध आहेत व आदिवासींना या सोयी विनामूल्य आहेत. या वैद्यकीय सुविधेचा लाभ ४५ हजारांहून अधिक आदिवासी घेत असून, वर्षाकाठी येथे ३०० शस्त्रक्रिया होतात. वन्यप्राण्यांसाठी येथे अनाथालय आहे. सात-आठ जातींचे कुत्रे, बिबटे, रानडुकरं, कोल्हे, अस्वल, हरणं, माकड, मगरी, नाग, पटेरी मण्यार, घोणस, अजगर, साळिंदर, घुबडं, शॅमेलिऑन असे विविध प्राणी येथे आहेत. हे अनाथालयाला प्राणीप्रेमींच्या देणगीतून ते चालवले जाते. त्यामुळेच या कार्याला सातत्याने प्रचंड निधीची गरज आहे.

मुंबईपासून १२०० किमी अंतरावर अतिदुर्गम प्रदेशात असलेल्या या प्रकल्पापर्यंत शहरी माणसाला पोहोचणे शक्य नाही, म्हणून हा लोकबिरादरी प्रकल्पच आता आपल्या दारापाशी आला आहे. या प्रदर्शनाला आपण कसा प्रतिसाद देतो, यावर आपल्या संवेदनांची, सुसंस्कृतपणाची आणि दानशूरतेची कसोटी लागणार आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं तिथे जाण्याची गरज आहे. विशेषत: पालक संस्कारक्षम वयात असलेल्या आपल्या मुलांना तिकडे घेऊन गेले आणि त्यांच्यासमोर आजवर आलेल्या आयुष्यापेक्षा सर्वस्वी भिन्न, जळजळीत वास्तव त्यांना दाखवले तर, पुढे करीअर मागीर् लागल्यानंतरही त्यांच्यातील सामाजिक भान जागे राहील आणि मग अशा प्रकारच्या चांगल्या प्रकल्पांना पैशांची ददात भासणार नाही. या प्रकल्पाला मदतीचा हात देण्यासाठी ९८६९४३११८५ किंवा ९८२१०१३६४१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Saturday, September 12, 2009

News in MAHARASHTRA TIMES dt. 8th Sept. 2009

ठाणे + कोकण

अपंगांच्या शुभेच्छा
8 Sep 2009, 0143 hrs IST
प्रिंट मेल Discuss शेअर सेव प्रतिक्रिया फॉन्ट:


- मुंबई टाइम्स टीम, ठाणे


आनंदवनातील अपंगांनी तयार केलेली दिवाळीसाठीची शुभेच्छा कार्ड आता ठाण्यात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. 'अपंग असोत किंवा काही कारणामुळे ज्यांना शारीरिक मर्यादा आल्या आहेत, त्यांना केवळ संधीची गरज आहे,' असं बाबा आमटे नेहमी म्हणत. वरोरा येथील आनंदवनात बाबांनी माणूस खऱ्या अर्थाने उभा केला आणि आपलं म्हणणं सार्थ करुन दाखवलं.

बाबा आमटे यांच्या कार्यावर असंख्य लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आनंदवन प्रकल्पाच्या मदतीसाठी तेथील अपंगांनी तयार केलेली दिवाळीची शुभेच्छा कार्ड विकत घ्यावीत, असं आवाहन आनंदवन स्नेही मंडळाने केलं आहे. आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या वतीने हा प्रकल्प दरवषीर् राबवला जातो. हे कलाकार दिवसाला ३६ भेटकार्ड तयार करु शकतात. ४६ आकर्षक डिझाइन्समध्ये ती तयार करण्यात आली आहेत. त्यांची किंमत अवघे १३ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ९९२०३६७५७०, ९८२११५०८५८. केवळ आनंदवनाला मदत करण्याच्या भावनेतून नाही, तर समाजाच्या तळागाळातील वर्गानेही जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पहावं, यासाठी त्यांचा हुरुप वाढवण्यासाठी या प्रकल्पात सहभाग घ्यावा असं आवाहन भाऊ नानिवडेकर, सत्यजीत शहा यांनी केलं आहे.

Lok Biradari Prakalpa Exhibition in GOREGAON



This was published in PRAHAAR dt. 11th Sept. 2009 .

Our KARYAKARTAS Mr. Suhas Chandekar , his wife are attending stall of ASM, Thane in this exhibition where GREETING CARDS are being sold.


Mr. Suyog Marathe has also spared his valuable time for this exhibition.