आनंदवन स्नेही मंडळाने उलगडला बाबा आमटेंचा जीवनप्रवासठाणे/प्रतिनिधी :
बाबा आमटे म्हणजे स्वप्ने आणि साहस यांचा सौदागर, अनंताला कवेत घेऊ पाहणारा गरुड, साक्षात् मृत्यूशीही दोन हात करणारा योद्धा, जमिनीशी घट्ट नाते राखणारा निर्माता, करुणेचा महासागर, वंचितांचा सखा, समरसून जीवन जगणारा एक कलासक्त कलंदर व्यक्तिमत्व होते. अशी बाबा आमटेंची अनेक रूपे ठाण्यातील आनंदवन स्नेही मंडळाचे श्रीराम नानिवडेकर यांनी उलगडविली.ठाण्यातील आनंदवन स्नेही मंडळातर्फे आचार्य अत्रे कट्टय़ावर पद्मभूषण बाबा आमटे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त बाबा आमटेंसोबत काम केलेल्या भाऊ नानिवडेकर यांनी बाबांच्या कार्याचा परिचय ‘मला उमजलेले बाबा’ या शीर्षकाखाली करून दिला. ठाण्यातील आनंदवन स्नेही मंडळ बाबा आमटेंच्या कार्याचा प्रचार व प्रसार करीत आहेत. यावेळी आनंदवन स्नेही मंडळाचे सत्यजीत शहा, गीता शहा, स्वाती आगटे, रंजना कुलकर्णी, मीनाताई पाटणकर, प्रसाद कर्णिक, प्राची केळकर, ज्योत्स्ना कदम आदी उपस्थित होते.बाबा आमटे यांनी १९४९ रोजी महारोगी सेवा समितीची स्थापना करून कुष्ठरोगी, अंध, कर्णबधिरांची वसाहत ओसाड माळरान असलेल्या वरोरा येथे वसवली. कुष्ठरोग्यांचे मानसिक व भावनिक पुनर्वसन नको तर काम, माया व आत्मसन्मान देण्यासाठी बाबांनी सर्व आयुष्य वेचले. शेती, डेअरी, विणकाम, पादत्राणे, गाद्या-गिरद्या, बॅगा जोडकाम आदी उद्योग सुरू करून त्यांना आधार दिला. हे सर्व करीत असताना शरीराकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले. शरीराचा कणा मोडलेले बाबा स्वत: तर ताठ कण्याने जगलेच, पण त्यांनी लाखोंना ताठ कणा दिला, असेही त्यांनी सांगितले.नानिवडेकर यांच्या व्याख्यानानंतर डॉ. प्रसाद कर्णिक यांनी बाबा आमटेंचा जीवनप्रवास स्लाईड शोद्वारे उलगडवून दाखविला.आनंदवनाच्या कार्याला हातभार लावण्यासाठी आनंदवन स्नेही मंडळाचे भाऊ नानिवडेकर- ९९२०३६७५७० व गीता शहा- ९८२१०३४४३६ यांच्याशी संपर्क साधावा.यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती विलास ठुसे यांनी दानशूरांनी दिलेले धनादेश नानिवडेकर यांच्याकडे दिले. संपदा वागळे यांनी प्रास्ताविक केले.
news appeared in THANE VRUTANT of LOKSATTA on 18th Feb. 2009 ( by Mr. Subhash Harad of LOKSATTA )
news appeared in THANE VRUTANT of LOKSATTA on 18th Feb. 2009 ( by Mr. Subhash Harad of LOKSATTA )
No comments:
Post a Comment