Monday, February 23, 2009

ज्यास देव सापडला माणसाच्या ठायी - संपदा वागळे

ज्यास देव सापडला माणसाच्या ठायी..संपदा वागळे‘वैष्णवी’ देवीला जाण्याचा योग माझ्या भाग्यात अजून आलेला नाही, तिरुपतीचं दर्शनही काही ना काही कारणानं लांबणीवर पडलेलं, पण या भूलोकावरील परमेश्वराचा ‘परीसस्पर्श’ लाभलेल्या ‘आनंदवन व हेमलकसा’ या तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची सुवर्णसंधी मला नुकतीच लाभली आणि ‘चारधामची यात्रा’ केल्याचं पुण्य माझ्या पदरात पडलं.विदर्भ एक्स्प्रेसने ‘नागपूर’ स्थानकात उतरून एका प्रायव्हेट बसने आम्ही थेट आनंदवनात गेलो. (सेवाग्राम एक्स्प्रेस पकडल्यास वरोरा स्टेशनपर्यंत जाता येतं.) आजचं गजबजलेलं आनंदवन पाहताना अक्षरश: शून्यातून ही प्रचंड श्रमसृष्टी उभारणाऱ्या त्या विधात्याच्या (स्व. बाबा आमटे) आठवणीने
आम्ही नतमस्तक झालो.समाजाने ‘टाकाऊ’ ठरवलेल्या कुष्ठरोग्यांचे हात इथे ‘त्याच’ बाहेरच्या जगासाठी अनेक उपयोगी वस्तूंचे उत्पादन करत आहेत. जुन्या टायर्सपासून सर्व ऋतूत चालतील अशा आरामदायी ‘चपला’ इथे बनतात. याच टायर्सच्या मदतीने ठिकठिकाणी बंधारे घातले आहेत. एवढंच नव्हे तर या टायर्सच्या कुंडय़ा बनवून त्यात जागोजागी झाडे लावली आहेत. वाया गेलेल्या अशा अनेक वस्तूंचा वापर ‘जिथे तिथे’ कल्पकतेने केलेला दिसला. ‘प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून मऊमऊ गाद्या व उशा’ हा चमत्कार इथे पाहायला मिळतो. अंध स्त्रियांना, हातमागावर सुंदर सतरंज्या विणताना बघून आपण अवाक् होतो. केवळ सतरंज्याच नव्हे, तर इथे तयार होणाऱ्या सुती बेडशीट्स, पिलोकव्हर्स, खादीचे कुडते, स्वेटर्स.. सगळंच दृष्ट लागण्यासारखं अप्रतिम आहे. फेकून दिलेल्या ‘एक्स-रे’ फिल्मस् व रस्त्यात सापडणारी गुटख्याची चमकदार पाकिटं यापासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू पाहून आपली मती कुंठीत होते. निरुपयोगी ठरलेल्या टाइल्सच्या तुकडय़ांनी जागोजागचे कट्टे व चौथरे चमकदार झाले आहेत.आनंदवनाच्या ‘सुतारकाम’ विभागात लाकडाच्या नाना वस्तू बनतात, तर इंजिनीअरिंग वर्कशॉप्समध्ये अपंगांच्या तीन चाकी सायकलींपासून स्टीलच्या मोठय़ा कपाटांपर्यंत म्हणाल ती चीज इथे उपलब्ध आहे. शिवाय प्रिंटिंग प्रेस, वाहन दुरुस्तीसाठी गॅरेज, योग सेंटर, वाचनालय, हॉस्पिटल, प्रयोगशाळा, वृद्धाश्रम, अनाथ मुलांसाठी गोकुळधाम, अंध मुलांसाठी वसतिगृह व संगीत विद्यालय, महाविद्यालये.. ही यादी न संपणारी आहे. ४५० एकर जागेत वसलेल्या या प्रतिसृष्टीत केवळ ‘मीठ’ ही एकच वस्तू बाहेरून आणावी लागते. इथल्या फुलांचे हारही अमृतसरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या देवालयात गेले आहेत.बाबा आमटे यांच्या समाधीस्थानाजवळ लिहिलेले शब्द- ‘हाँथ लगे निर्माण में। नही माँगने, नही मारनें।’ इथे प्रत्यक्ष कृतीत उतरलेले दिसतात. इथल्या प्रत्येक कुष्ठरोग्याचे हात कोणत्या ना कोणत्या कामात गढून गेले आहेत. याच हातांनी इथे १४ तलाव खणले आहेत. ही माणसे आपल्याशी आत्मविश्वासाने बोलतात. त्यांच्या बोलण्या-वागण्यातून बाबांबद्दलची कृतज्ञता पावलोपावली डोकावत असते. हा चमत्कार पाहताना, साधनाताईंच्या ‘समिधा’ पुस्तकात वाचलेला, विनोबाजींचा पहिलावहिला आशीर्वाद, ‘या ठिकाणी सेवेचे रामायण घडेल..’ आठवत राहतो.डॉ. विकास आमटे ‘झरी’ प्रकल्पावर गेले असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. पण साधनाताईंशी चार शब्द बोलण्याचं भाग्य आम्हाला लाभलं.आनंदवनचा कायापालट पाहिल्यावर हेमलकसाची ओढ लागली. नागेपल्ली गावापासून आता पक्का रस्ता झालाय खरा, पण वाटेत आजूबाजूला भामरागडचं दंडकारण्य असल्यामुळे संध्याकाळी पाचच्या आत मुक्कामाला पोहोचण्याच्या हिशोबाने निघावं लागतं.गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा व प्राणहिता या नद्यांनी वेढलेल्या या प्रदेशात चंद्रपूरपासून २०० किलोमीटर अंतरावर हेमलकसा आहे. इथला लोकबिरादरी प्रकल्प आनंदवनच्या मानाने खूप लहान. साधारण ५० एकरात दवाखाना, ऑपरेशन थिएटर, प्रयोगशाळा, आश्रमशाळा, मुला-मुलींची वसतिगृहे, कार्यकर्त्यांची घरे.. इ. वास्तू उभारण्यात आल्या आहेत.येणाऱ्या पर्यटकांसाठी आश्रमामध्येच राहण्या-जेवणाची (दोन्ही ठिकाणी) सोय केली जाते. स्वच्छतागृहाबाहेर हौद बांधून भरपूर पाण्याची सोय केली आहे. आता हेमलकसापर्यंत वीज व फोन या सुविधाही पोहोचल्या आहेत.आलेल्या प्रत्येक ग्रुपला प्रकल्प दाखवण्याचे व त्यांची व्यवस्था ठेवण्याचे काम आश्रमशाळेतील ठराविक शिक्षक करतात. आमच्याबरोबर सचिन नावाचा पोरगेलासा, चुणचुणीत स्वयंसेवक होता. इथल्या रात्रीच्या जेवणाची वेळ साडेसात व सकाळच्या नाश्त्याचीही वेळ तीच. इथे एकूण तीन ‘मेस’ आहेत. एक आश्रमशाळेची, दुसरी पेशंटस्साठी, तर तिसरी पाहुणे व कार्यकर्त्यांसाठी. जेवणाला अप्रतिम चव. याचं कारण म्हणजे सगळ्या भाज्या सेंद्रीय खतावर पोसलेल्या. त्या गरमागरम, रुचकर, पोटभर जेवणाची तृप्ती आजही मनात रेंगाळतेय. डॉ. प्रकाश आमटे व त्यांचे कुटुंबीय आमच्याच पंक्तीत जेवले. इथे कोणाच्याही घराला स्वयंपाक खोली नाही. सर्वानी एकत्र ताटाला ताट लावून जेवायचं.सहज जेवणघरात डोकावले तर तिथे फक्त आठ-दहा हात काम करत होते. बायोगॅसला जोडलेल्या मोठय़ा चुलीवर एक जण एकाचवेळी चार चपात्या (एक पोळपाटावर व तीन मोठय़ा तव्यावर) करण्याची कसरत सहजपणे करत होता. त्याच्या कौशल्यावरून नजर हटेना. जेवल्यानंतर सचिनने ‘अरण्यातील प्रकाशवाटा’ ही सीडी दाखवली. त्यामुळे हेमलकसाचा गेल्या ३५ वर्षांचा इतिहास कणाकणाने उमगत गेला. रोज सकाळी आठ वाजता डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे, उभयता पाहुण्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घराबाहेरच्या अंगणात येऊन बसतात. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेली ही माणसं एवढी साधी व विनम्र आहेत की त्यांना बघून आपण दिगम्मूढंच होतो. आदिवासींच्या सहवासात राहताना त्यांनी आपल्या गरजा कमीत कमी केल्या आहेत. इथे उन्हाळ्यात ४८ अंशपर्यंत तापमान वाढतं, तर हिवाळ्यात प्रचंड गारठा, तरीही बाबांच्या पावलांवर पाऊल ठेवून डॉ. प्रकाश व डॉ. दिगंत (मोठा मुलगा) फक्त बनियन व हाफ पॅन्टवरच वावरतात.डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी आम्ही बोलत असतानाच एक आदिवासी हातात एक रिपोर्ट व एक्स-रे फिल्म घेऊन आला. त्याला त्याच्या ‘माडिया’ भाषेत सूचना देऊन झाल्यानंतर डॉ. आम्हाला म्हणाले, ‘याचं हिमोग्लोबीन ५.२ आहे व एक फुफ्फुस पूर्णपणे निकामी झालंय. अशा अवस्थेत तो १०० किमी अंतर पायी चालत इथपर्यंत आलाय.’ हे ऐकल्यावर आम्ही नि:शब्द झालो.वर्षांतून एकदा होणारा मेडिकल कॅम्प, आम्ही जाण्याच्या दोन दिवस आधीच पार पडला होता. यात २५० ऑपरेशन्स करण्यात आली होती. अगदी कॅटरॅक्टपर्यंत कॅन्सपर्यंत. वॉर्डमधील जागा कमी पडल्याने उरलेल्या पेशंट्सनी बाहेर झाडाखालीच डेरा टाकला होता. दोनच दिवसांपूर्वी मोठ्ठं ऑपरेशन झालेले पेशंट मुक्तपणे सर्वत्र फिरत होते. सारा परिसर हाच त्यांचा आयसीयू वॉर्ड होता.डॉक्टरांसमवेत आम्हीही पेशंटस्मधून राऊंड मारला. कोणाचे हात, पाय झाडावरून पडून मोडलेले, तर कोणी शेकोटीजवळ जाऊन झोपल्याने भाजलेला, सर्पदंश, कुपोषण, जलोदर अशा आजाराने ग्रासलेले रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यातील आदिवासी पाडय़ांमधून आले होते. इथे इलाजासाठी पैसे घेतला जात नाही. शिवाय रुग्णांच्या जेवणा-खाण्याचीही सोय होते, हे कळल्यामुळे आता इथली ओपीडी ओसंडून वाहात असते. डॉ. दिगंत व डॉ.. अनघा यांना तर मान वर करायलाही फुरसत नव्हती. आमटे कुटुंबांचा हा ‘सेवायज्ञ’ बघून आपण थक्क होतो.डॉक्टरांनी नंतर आम्हाला त्यांच्या प्राणीमित्रांकडे नेलं. बरोबर त्यांचा साडेतीन-चार वर्षांंचा नातू अर्णवही होता. बिबटे, रानडुकरे, अस्वल, नाग, घोरपड, साळिंदर असे प्राणी त्यांच्या छोटय़ा मालकालाही ओळखत होते. आमटय़ांची चौथी पिढीही त्या संस्कारक्षम वातावरणात घडताना दिसली. आदिवासींनी पिल्लं असताना आणून दिलेले हे प्राणी आता इथे स्वतंत्र पिंजऱ्यात वाढत आहेत. एवढे प्राणी असूनही कोणताही वास नाही की घाण नाही. सगळे कसे पार्लरमधून आल्यासारखे स्वच्छ; जणू प्रत्येकाला देवत्वाचा स्पर्श लाभलेला.हेमलकसाच्या आश्रमशाळेत आज ६४२ विद्यार्थी शिकत आहेत, त्यापैकी ४५० मुलांना ग्रॅन्ट आहे. बाकीच्यांची मदार देणग्यांवर. ही मुलं पहाटे पाचलाच उठतात आणि आन्हिक उरकून भाज्या चिरणे, शाळा, वसतिगृह, रस्ते झाडणे, जंगलातून सरपण आणणे अशी नेमून दिलेली कामे करायला बाहेर पडतात. रोज सकाळी ९० किलो भाजी चिरली जाते, तसंच झाडणंही एवढं स्वच्छ की आश्रमातल्या रस्त्यांवर कागदाचा एक कपटाही दिसत नाही.आम्ही संध्याकाळी जेव्हा प्रकल्पावर पोहोचलो, तेव्हा वसतिगृहातील मुली बाहेरच्या अंगणात जमून सामूहिक प्रार्थना, पाढे, श्लोक, देशभक्तीपर गीते सुरात म्हणत होत्या. शहरातून गायब झालेले हे ‘शुभंकरोती’ संस्कार कानावर पडताच मन प्रसन्न झालं. रात्री काही मुलांचा बांबूनृत्य व लोकनृत्याचा सराव पाहिला. या मुलांना उपजत असलेलं तालाचं ज्ञान समजून येत होतं. राज्य पातळीवरील आंतरशालेय स्पर्धेसाठी ही तयारी सुरू होती. या मुलांमधील काटकपणा व साहस ओळखून आता त्यांना धावण्याच्या सरावासाठी एक खास ट्रॅक करून देण्यात आला आहे. डॉक्टरांचा दुसरा मुलगा अनिकेत व त्याच्या पत्नीने मुलांच्या व्यवसाय प्रशिक्षणासाठी कंबर कसल्याने या मुलांनी बनविलेल्या बांबू कामाच्या सुबक वस्तू व तऱ्हेतऱ्हेच्या कापडी पिशव्या आता या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होईल.डॉ. प्रकाश आमटे यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे त्यांचे सहकारी विलास मनोहर, त्यांच्या पत्नी रेणुकाताई, निवृत्त मुख्याध्यापक दादा पांचाळ, प्रभा फडणीस, जगन व मुक्ता मचकले यांच्याशी झालेल्या गप्पांतून या मावळ्यांच समर्पण उलगडत गेलं. ध्येय वेडाने ‘हेमलकसा’ला येणारे सर्वच कार्यकर्ते एकापेक्षा एक. भास्कर शिरसाठ या आश्रमशाळेतील एका तरुण संगीत शिक्षकाशी आमची ओळख झाली. हा युवक संगीत व तबला विशारद असून आधी वरोऱ्याच्या डी.एड्. कॉलेजमध्ये शिकवत होता. तिथल्या महिना १५ हजाराच्या नोकरीवर पाणी सोडून तो दोन वर्षांंपासून हेमलकसा इथे महिना दोन हजार रुपये मानधनावर मुलांना संगीताचे धडे देत आहे. इथल्या आदिवासी मुलांसाठी आता संगणक शिक्षणाची सोयही झाली आहे. पुण्याहून आलेल्या एक संगणक अध्यापिका मुलांना हे ज्ञान देत आहेत. हे सारे पाहिल्यावर प्रवीण दवणे यांच्या कवितेतील ‘ज्यास देव सापडला माणसाच्या ठायी, त्यास मंदिराच्या भिंती, दिशा सर्व दाही’ या पंक्ती आठवल्या.

an article by Ms. Sampada Wagle of ATRE KATTA appeared in THANE VRUTANT dt. 15th Feb. 2009.

No comments:

Post a Comment