FOllowing News article appeared in Ma Ta dt. 31st March, 2014
बाबांनी श्रमप्रतिष्ठा जागवली!
तंत्रज्ञान आणि मानवी श्रमाची सांगड बाबा आमटेंनी सुरेख घालून दिली. आम्ही तोच वारसा पुढे चालवित आहोत. श्रमसंस्कार छावणीच्या शिबिरीच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्ते घडविले. '१० हजारांमधून एखादा कार्यकर्ता घडतो, असे १० हजार कार्यकर्ते मला द्या मी देश बदलून दाखवेन असे बाबा म्हणत, ते प्रखर आशावादी होते,' असे सांगत स्व. बाबा आमटेंचा जीवनपटच त्यांच्या स्नुषा डॉ. भारती आमटे यांनी नुकताच उलगडला.
घंटाळी मित्रमंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'तेथे कर माझे जुळती' या विषयावर डॉ. आमटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. सहयोग मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे व्यासपीठावर उपस्थीत होते. आनंदवनातील श्रमसंस्कार छावणीत आलेले कार्यकर्ते आजही आनंदवनाशी जोडलेले आहे. बाबा सृजनशील होते, त्यांना भटकंतीची आवड होती. कुष्ठरोग्याची मला घृणा का आली असा विचार त्यांच्या मनात आला आणि ते या कार्याकडे वळले. बाबा नास्तिक होते, अस समज आहे, प्रभूचे हजारो हात माझ्या कामात गुंतले आहेत असे ते मानत, असे सांगत डॉ. आमटे यांनी बाबांच्या अनेक आठवणी जागविल्या.
कुष्ठरोग्यांना सन्मानाने जगता आले पाहिजेच; पण मरताही सन्मानाने आले पाहिजे, यासाठी त्यांनी आनंदवनात वृध्दाश्रमही सुरू केला आणि कौटुंबिक सौख्य मिळावे यासाठी त्यांची लग्नेही लावून दिल्याची त्या म्हणाल्या. त्यांच्या विविधांगी कार्याचा आढावा घेताना बाबा एका जन्मात अनेक जन्म जगल्याचे त्या कृतज्ञतापूर्वक म्हणाल्या.
No comments:
Post a Comment