Monday, June 9, 2014

बाबांचा वसा पुढे चालवतोय… ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची भावना




 

बाबांचा वसा पुढे चालवतोय…

Jun 9, 2014, 03.59AM IST


ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'न सांगितलेल्या, पण अनुभवलेल्या संस्कारात वाढलो. वाट खडतर असतानाही बाबांचा वसा पुढे चालवतोय,' अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.

तळेगाव दाभाडे येथील फलके एफएमसीजी कंपनीच्या 'संपूर्ण सिद्धी' उत्पादनाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त डॉ. आमटे यांचा कार्यगौरव आणि प्रकट मुलाखतीचे आयोजन कासारवाडीतील हॉटेल कलासागरमध्ये नुकतेच करण्यात आले होते. त्या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तळेगावचे नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, देवराईचे संस्थेचे संस्थापक सुकनशेठ बाफना, अध्यक्ष गिरीष खैर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र फलके, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश फलके या वेळी उपस्थित होते. लोक बिरादरी प्रकल्पासाठी एक लाख रुपयांची देणगी या वेळी देण्यात आली.

डॉ. आमटे म्हणाले, 'बाबा जे बोलत ते करून दाखवत. कोणी न सांगितलेल्या परंतु प्रत्यक्ष अनुभवलेल्या संस्कारातूनच विकास आणि मी दोघेही वाढलो. मजुरांच्याच शाळेत शिकलो. बाबांमुळे खूप मोठे व्यक्ती दुरून का होईना अनुभवता आल्या. वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यावर बाबांनी भाभ्रागड येथील आदिवासी गावांमध्ये फिरवले. तेव्हाच तिथे काम करायचे असल्याचे सांगितले. वाट खडतर असतानाही बाबांचा वसा पुढे चालवण्यासाठी एका झोपडीतून कामाला सुरुवात केली. सुरुवातीला दूर पळणाऱ्या माणसांना विश्वास दिला. तेव्हा ते जवळ येवून उपचारासाठी आमच्याकड़े येवू लागले.'

ते म्हणाले, 'पडक्या झोपडीत राहून आदिवासी लोकांच्या जखमा पुसल्या. त्या जखमा धुण्यातही एक आनंद होता. जखम बरी झाल्यावर व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून समाधान मिळायचे. मायेने जवळ केलेल्या जंगली प्राण्यांनाही प्रेमाची भाषा समजते, हे सिद्ध करता आले. म्हणूनच, मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी यांच्या खूप जवळ पोहचता आलं, हे आपलं भाग्य आहे.'

मंदाताई यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या प्रवासातील प्रकाश आमटे यांच्याशी असलेली जवळीक, आनंदवनात झालेला प्रेमविवाह, माहेरच्या नातेवाईकांचा तुटलेला संपर्क आणि हेमलकसा जंगलातील प्रवास उपस्थितांना उलगडून सांगितला.

'प्राण्यांनाही समजते प्रेमाची भाषा'

'मी त्यांच्याशी आयुष्यभर साथ देण्याचा वसा तेव्हाच घेतला होता. तोच वसा आजही आमच्या सुना तितक्याच जोमाने चालवतात. एका माकडाच्या पिल्लापासून घरी प्राणी यायला सुरुवात झाली. त्यानंतर मायेने जवळ केलेल्या जंगली प्राण्यानांही प्रेमाची भाषा चांगली समजते, हे जगाला सिद्ध करून दाखवता आले. आमच्याबरोबर माकड, वाघ, कुत्रा आणि हरीण जेव्हा नदीवर फिरायचे, तेव्हा ते टिपायला एखादा छायाचित्रकार असायला हवा होता,' अशी भावना मंदा आमटे यांनी या वेळी व्यक्त केली.

Sunday, June 8, 2014

मुक्काम पोस्ट हेमलकसा


Following article was published in DIVYABHARATI

मुक्काम पोस्ट हेमलकसा

समीक्षा आमटे | Jun 06, 2014, 05:52AM IST
   
मुक्काम पोस्ट हेमलकसा

बाबा आमटे हे खरे तर तुमच्या-आमच्यासारख्याच साध्या घरातून आलेले एक सर्वसामान्य तरुण. 

त्यांच्या नशिबाने आयुष्यात आलेले कलाटणीचे प्रसंग त्यांनी हेरले आणि परिस्थितीचे सोने केले. ते एका सधन कुटुंबातले आणि शौक करणारेच होते. आपण सगळेच झोपेतून उठल्यावर सुरुवातीला आळशी असतो, तसेच हे पूर्वायुष्य म्हणता येईल. झोपेतून उठल्यावरचा अर्धाच तास. पण नंतर आपल्याला बरेच चांगलेवाईट अनुभव येत जातात, त्या अनुभवांचे आपण काय करतो हे आपल्यावर असते. मला वाटते, प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी कलाटणी केव्हा ना केव्हा येत असते. नेमक्या त्या वळणावर आपले निर्णय आणि धाडस आपल्याला सामान्यच ठेवतात किंवा असामान्य बनवतात.

लोकबिरादरी प्रकल्पाचे सगळेच कार्यकर्ते असेच सामान्य, साध्या घरातून आलेले पण वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांनी दाखवलेला समंजसपणा, धैर्य त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. हाच गुण प्रत्येक भव्य व मोठ्या कामाचा गाभा असावा. कारण वेगळ्या आणि अवघड वळणांची भीती तर प्रत्येकाला वाटत असते. मी कशालाच घाबरत नाही, हे म्हणजे धाडस नाही, त्यापलीकडे काहीतरी आहे, जे आपल्याला मिळवायचे हे ज्यांना कळते तेच सकाळचा आळस झटकू शकतात.

1970मध्ये एक कुटुंब भामरागडच्या दाट जंगलात सहलीला गेले होते. निसर्गरम्य परिसर, संथ वाहणार्‍या नद्यांचे त्रिवेणी संगम, वन्य प्राणी, या सगळ्याचा आनंद घेताना त्यांना दिसली तिथली विलक्षण माणसे, आरोग्य आणि शिक्षणाचा गंध नसलेली. त्या कुटुंबप्रमुखाने ठरवले, की इथेच या माणसांसाठी काम करायचे. त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांना सामील होण्याचे वचन दिले. या कलाटणीच्या क्षणी, एमबीबीएस शिकणार्‍या एका विद्यार्थ्याचे मॅगसेसे विजेते डॉ. प्रकाश आमटे यांच्यात रूपांतर झाले. तसेच प्रेमाखातर नवर्‍याबरोबर कुठेही, कसेही राहायची तयारी असणारी एक मध्यमवर्गीय डॉक्टर तरुणी असामान्य झाली. हीच कहाणी रेणुका व विलास मनोहर, गोपाळ फडणीस व प्रकल्पातल्या प्रत्येकाचीच आहे.

प्रकल्पाची सुरुवात 1973 साली झाली. कार्यकर्ते इथे झाले, हे काम एकट्याचे नाही, ही एक प्रचंड मोठी पार्टनर्सची, भागीदारांची, साथीदारांची यशस्वी साखळी आहे. या साखळीतले सगळे लोक नेमून दिलेले काम उत्तम तर करतातच; पण गैरहजर, नादुरुस्त साखळ्यांचा भारसुद्धा आनंदाने आणि समर्थपणे उचलतात.

या प्रकल्पात आज एक सुसज्ज दवाखाना आहे, ज्याला लवकरच एक भव्य अत्याधुनिक वास्तू मिळणार आहे. दवाखान्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. अनघा व डॉ. दिगंत सांभाळतात. माडिया व इतर आदिवासी जमातींसाठी एक शाळा आहे, ज्याचं काम मी व माझा नवरा अनिकेत पाहतो. वन्य प्राण्यांचे अनाथालय आहे. याचबरोबर बांबू हस्तकला, डेअरी व कुक्कुटपालन प्रकल्पदेखील आहेत, ज्या सगळ्याचा भार अनिकेतवरच आहे. आम्हाला या सगळ्या कामात तरुण, कष्टाळू व प्रचंड प्रेमळ कार्यकर्ते मिळाले हे आमचे भाग्य. प्रकल्पाच्या 33 एकर जमिनीवरच शाळा, दवाखाना, प्राणी अनाथालय, तीन मोठी वसतिगृहे व इतर प्रकल्प अहेत. तसेच आम्ही सर्व कार्यकर्ते व इतर मंडळींची घरेसुद्धा याच वास्तूत   आहेत. सर्व अर्थांनी आम्हा सगळ्यांचा मुक्काम व पोस्ट एकच आहे.

आता वेगळा निर्णय तर घेतलाय, पण पुढचा मार्ग दाखवायला बाबांची शिकवण व वागणुकीचा आदर्श होता. त्यांची एक शिकवण म्हणजे एकत्र जीवन आणि एकत्र जेवण. प्रकल्पात आम्ही सहजीवन तर अनुभवतोच, पण त्याबरोबर जेवणही एकत्र रसोड्यात असतं.
जातीधर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही सण साजरे करतो. तसेच आमच्याकडे काम आणि सामाजिक जीवन तसे जवळजवळ एकच आहे म्हणा ना. बाकीच्या जगापासून लांब असल्याने, आहेत त्याच व्यक्तींमध्ये काका/मामा/मावशी अशी नाती शोधत-जोडत इथले कार्यकर्ते आनंदाने राहातात. पण भांडणं, वादविवाद तर होतच राहतात, या नैसर्गिक मनुष्यप्रकृतीला हेमलकसा कसा अपवाद ठरेल? कोणाची बाजू घ्यायची वेळ आली तर काय करावे? तेव्हा सासर्‍यांच्या वागण्याचा आदर्श आम्ही पाळतो. लगेच प्रतिक्रिया नाही द्यायची, दोन दिवसांनी आपल्या लक्षात येते की क्षुल्लक कारण होते. आणि मग मोकळ्या मनाने ते विसरून आपल्या माणसाला जवळ करायचे.

बाबांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, की इथे आल्यावर कुष्ठरोगी काम करतात, परिश्रम करून सन्मानाने राहतात तेव्हा समाधान तर वाटतंच; पण त्याहीपलीकडे जाऊन जेव्हा ते दुकानात जाऊन स्नो, पावडर विकत घेतात तेव्हा जास्त आनंद होतो. म्हणजे ते जीवनाच्या प्रेमात पडतायत, असे आम्ही समजतो. मानाने तर जगतातच, पण जगण्यावर प्रेम करत जगताना पाहून बाबांना कामाची पावती मिळते.

तर सांगायचे हे, की हा एवढा मोठा व्याप ही एक सुंदर आणि निर्भेळ पार्टनरशिपच आहे. परस्परांशी कोणतेही नाते नसलेल्या शेकडो - हजारो लोकांची. ज्यात प्रकल्पासाठी राबणारे कार्यकर्ते तर आहेतच, पण अनेक शुभचिंतक आणि स्नेहीही आहेत. ही मन-भावनांची साखळी अशीच अखंड राहो, हीच प्रार्थना. यामध्ये असे कैक अज्ञात लोक आहेत ज्यांनी भरीव मदत केली आहे. आमच्या शाळेची मुले जेव्हा पुणे किंवा मुंबई अशा मोठ्या शहरांत येतात तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यावर उत्तर ही माणसे शोधतात. कालच एक मुलगी सांगत होती, की तिच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी तिच्या दुपारच्या डब्याची खास सोय केली. रसायनशास्त्राचे शिक्षक इतक्या पोटतिडकीने शिकवतात, की तिने पैकीच्या पैकी मार्क मिळवले. अशी कितीतरी उदाहरणे, कधीही या लोकांची माझी भेट नाही. वाटते कसे यांना सांगावे की त्यांच्या छोट्याशा कृतीने त्या चिमुकलीचे आयुष्य बदललेय, पण thank you सारख्या शब्दांनी त्या भावना पोचणार नाहीत किंवा त्या गढूळ होतील अशीही भीती वाटते. म्हणून त्यांचे भले व्हावे, हीच मनोकामना. अशी अज्ञात मंडळी हे आमच्या साखळीतले वंगण आहे, जे दिसत नाही पण खूप मोलाचे आहे. आज त्या सगळ्या अज्ञातांना आदराचा सलाम!

समीक्षा आमटे
sam.aqua18@gmail.com