Interview of Dr. Prakash & Dr. Mrs. Mandatai Amte @ Rambhau Mhalgi Vyakhanmala Thane
Following news was published in LOKSATTA – THane Vrutant dt. 14th Jan. 2011 , about the interview taken by Mrs. Dhanashree Lelel.
‘आदिवासींमध्ये वैद्यकीय उपचारांची जाणीव वाढली’
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला
ठाणे/प्रतिनिधी
बाबा आमटे यांच्या पावलावर पाऊल टाकत हेमलकसासारख्या आदिवासी भागात डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे दांपत्याने काही मूठभर सहकाऱ्यांना सोबत घेऊन सुरू केलेला प्रकल्प, लोकबिरादरीचे काम, हेमलकसा येथील प्रकल्प उभारताना आलेल्या अडचणी, तेथील आदिवासींशी संपर्क साधताना आलेले अनुभव या साऱ्यांच्या आठवणीत आमटे दांपत्याबरोबर ठाण्यातील श्रोतेही हरवून गेले होते. निमित्त होते ठाण्यात सुरू असलेल्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याखानमालेचे. या व्याखानमालेत आमटे दांपत्याची मुलाखत धनश्री लेले यांनी घेतली. आमटे दांपत्याचा संघर्ष ऐकायला सरस्वती सेकंडरी शाळेच्या पटांगणावर श्रोत्यानी भरपूर गर्दी केली होती.
आमचे बाबा निर्भय होते, आम्हालाही त्यांनी तसेच घडवले. त्यांची व आमची काम करण्याची पद्धती वेगळी आहे. आनंदवनाच्या कारभाराची घडी बसू लागल्यावर आम्हाला हेमलकसा येथे नवीन प्रकल्पासाठी त्यांनी मोक ळे केले. त्यातून आम्ही हेमलकसाचा प्रकल्प चालवून दाखवला. आता पुढील १० वर्षांनी हेमलकसा कसे असेल, याची माहिती आमची मुले, सुना देऊ शकतील, असे सांगून डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या शब्दातून हेमलकसाचे वातावरण सर्वांसमोर उभे केले.
एकेकाळी सुई, डॉक्टरला घाबरणाऱ्या आदिवासींमध्ये आता वैद्यकीय उपचारांबद्दल जाणीव वाढलेली आहे. वर्षांला ४० हजार रुग्ण ओपीडीत तपासण्यासाठी येतात. आता नागपूरहून अनेक डॉक्टर देखील मेडिकल कॅम्पसाठी विनामोबदला काम करण्यासाठी येतात. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात दोन दिवसांच्या कॅम्पमध्ये विविध आजारांवरील २४० ऑपरेशन्स हेमलकसाला केली गेली, अशी माहिती डॉ. प्रकाश आमटे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. १९७६ साली आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेचा विस्तार वाढला असून ६५० मुले आज शिक्षण घेत आहेत. सुरुवातीला त्यांच्या भाषेतील वर्णमाला आम्ही केली. नंतर मराठी आणि नंतर इंग्रजीची ओळख मुलांना करून देण्यात आली. आज याच शाळेची काही मुले डॉक्टर झाली, शिक्षक झाली, वकील झाले, इंजिनीअर झालेत, मात्र हेमलकसाला कोणी विसरले नाही.
हेमलकसाला वन्य प्राण्यांचे अनाथालय सुरू झाले, त्यावर बोलताना डॉ. मंदा आमटे यांनी मला प्राण्यांची फार काही आवड नव्हती. एक एक करीत चक्क वाघ वगैरे यांनी पाळायला घेतल्यावर त्याला मांसाहार देताना मला कसेसे व्हायचे. मी पूर्ण शाकाहारी आहे. आमच्या फ्रिजमध्ये वाघासाठी उरलेले मटण, आमची औषधे, आमच्या भाज्या सारे काही एक त्रच असायचे. आता त्याचे काही वाटत नाही असे मंदाताईनी सांगितले. पुढील जन्मी देखील प्रकाश आमटेंना डॉक्टरचे आयुष्य देऊन गरजू रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य मिळू दे, अशी आपली भावना असल्याचे त्यांनी सांगितले. हेमलकसाला असताना घोणस चावून झालेली विषबाधा, भोवऱ्यातून माणूस फेकला जातो हे पाहण्यासाठी स्वत: भोवऱ्यात उडी मारून पाहिलेला अनुभव.बिबळ्या व मुलीचे नाते..अस्वलाने जखमी केलेल्या माणसावर केलेले उपचार असे अनेक प्रसंग आमटे यांनी सांगितले.
आता आमटे कुटुंबाची तिसरी पिढी, नवीन कार्यकर्ते या कामासाठी तयार झाले आहेत. त्यांच्यावर जबाबदारी सोपवून महिन्यातून दोनदा तरी व्याखाने, कार्यक्रमांसाठी प्रेरणा वाटत आम्ही दोघं फिरत असतो, असे आमटे दांपत्याने शेवटी सांगितले.
Saturday, March 5, 2011
Subscribe to:
Posts (Atom)